सांगलीत राष्ट्रवादीअंतर्गत मारामारी

सांगली : विकास कामाच्या प्रस्तावावरून सांगली महापालिकेच्या बांधकाम विभागात राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेच्या पतीने मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या संदर्भात दोघांनीही एकमेकांविरुध्द पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू असतानाच प्रकरण आपसात मिटविण्याचे प्रयत्नही सुरू होते.

महापालिकेच्या प्रभाग २० मधून राष्ट्रवादीचे तीनही नगरसेवक निवडून आले असून हा प्रभाग मिरज शहरातील आहे. या प्रभागात माजी स्थायी सभापती संगीता हारगे याही निवडून आल्या असून त्यांच्यासोबत माजी महापौर विवेक कांबळे यांना पराभूत करून योगेंद्र थोरात आणि स्वाती पारधी हेही निवडून आले आहेत. या प्रभागातील विकासकामे सुचवित असताना श्रीमती हारगे या आपल्या अनुभवाच्या जोरावर आग्रह करीत असल्याचा आक्षेप थोरात यांनी घेतला आहे.

यातून प्रशासनावर दबाव आणण्याचे काम ते करीत असल्याचा आक्षेप हारगे यांचा आहे.

मंगळवारी दुपारी थोरात महापालिकेच्या बांधकाम विभागात दिलेल्या कामाच्या प्रस्तावाबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. याचवेळी श्रीमती हारगे या पतीसह त्याठिकाणी आले. यावेळी कामाच्या प्रस्तावावरून हारगे आणि थोरात यांच्यात वाद सुरू झाला. एकमेकांना शिवीगाळ आणि बघून घेण्याची भाषाही सुरू होती. याच दरम्यान हारगे यांनी थोरात यांना मारहाण केली. या मारहाणीमुळे थोरात यांना इजा झाली असून तोंडातून रक्त येऊन दुखापत झाली.

दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचे समजताच हारगे यांचे समर्थक महापालिकेच्या मुख्य कार्यालयात जमा झाले. एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली. या घटनेतनंतर महापालिकेच्या मुख्य कार्यालयात गोंधळ माजला.

या घटनेनंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी पालिका आवारात धाव घेतली. थोरात यांनी हारगे यांच्याविरूध्द तक्रार दाखल करण्यासाठी समोरच असलेल्या शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे हारगे यांनीही तक्रार दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोघांनीही परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतल्याने खळबळ माजली असून दोघांचीही समजूत काढून प्रकरण आपसात मिटविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.