News Flash

चार मुलांची हत्या करून पती-पत्नीची आत्महत्या

मालेगावातील घटना पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यानंतर तीन मुलींसह मुलाची गळा दाबून हत्या करून एका परप्रांतीयाने स्वत: गळफास घेतल्याचा प्रकार येथील संगमेश्वर भागात गुरूवारी सकाळी उघडकीस आला.

| April 26, 2013 04:40 am

मालेगावातील घटना
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यानंतर तीन मुलींसह मुलाची गळा दाबून हत्या करून एका परप्रांतीयाने स्वत: गळफास घेतल्याचा प्रकार येथील संगमेश्वर भागात गुरूवारी सकाळी उघडकीस आला. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ उत्तर प्रदेशातील बदाऊ येथील सुरेश रामभरोसे साहू (४०) हा पत्नी सुनिता (३५) आणि चार मुलांसह शहरातील संगमेश्वर भागात पवननगर येथे लाकडी फळ्यांच्या भाडय़ाच्या घरात वास्तव्यास होता. हातगाडीवर भांडी विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय होता. गुरूवारी सकाळी दहा वाजता नळाना पाणी आल्यावर बराच वेळ होऊनही या कुटूंबातील कोणीच पाणी भरण्यासाठी बाहेर आले नाही. घराचा दरवाजादेखील आतून बंद होता. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना संशय आला. त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर उपअधीक्षक योगेश चव्हाण व छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कांबळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर कुटूंबातील सर्व सहा सदस्यांचे मृतदेह आढळून आले. सुनिताचा (३५) मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत छताला लटकलेला होता तर गळ्याभोवती दोरखंड असलेला सुरेशचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. या दाम्पत्याला अंकिता (१४), रोशनी (३), डिंपल (सात महिने) या तीन मुली आणि दीपक (७) हा मुलगा होता. अंकिता सहावीत तर दीपक दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. वादविवादानंतर प्रथम पत्नीने गळफास घेतला. त्यानंतर सुरेशने चारही मुलांचा झोपेतच गळा दाबला व स्वत: गळफास घेतली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बुधवारी रात्री अकरा वाजेपर्यंत सुनिता गल्लीतील महिलांशी गप्पा मारत बसली होती. कुटूंबात आपापसात कोणतीही कुरबूर नसल्याची माहिती गल्लीतील लोकांनी दिली. या कुटूंबाचे सर्वाशीच चांगले संबंध होते. अशा स्थितीत ही घटना घडल्याने संगमेश्वर परिसर हादरला आहे. सुरेशचे भेळपुरी विक्रीचा व्यवसाय करणारे काही नातेवाईक शहरात अन्यत्र वास्तव्यास आहेत. ते तातडीने घटनास्थळी उपस्थित झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 4:40 am

Web Title: husband wife committed suicide after murdered four child
Next Stories
1 जिल्हा भूविकास बँकांसाठी ११ सदस्यांची समिती
2 तेंदूपाने लिलावप्रक्रिया मार्गी लागणार?
3 शाहू स्मारकाच्या जागेवरून नवा वाद
Just Now!
X