अक्कलकोटजवळ रूळ तुटून मोठी फट; अनर्थ टळल्याने समाधान
मुंबईहून हैदराबादकडे भरधाव वेगाने निघालेली हुसेनसागर सुपरफास्ट एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी सोलापूरच्या पुढे अक्कलकोटजवळ दुधनी रेल्वे स्थानकाजवळ आली असता अचानक रेल्वे रूळ तुटून त्यात मोठी फट पडली. परंतु, वेगात धावणारी ही गाडी वेळीच थांबल्याने अनर्थ टळला. घडलेल्या या घटनेमुळे गाडीतील प्रवासीही खडबडून जागे झाले. प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाने समाधानाचा सुस्कारा सोडला.
दुधनी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हुसेनसागर एक्स्प्रेसला त्याच ठिकाणी एक तास २० मिनिटे थांबावे लागले.
पहाटे सोलापुरात थांबा घेऊन पुढे अक्कलकोट मार्गे ती रवाना झाली. अक्कलकोटच्या पुढे दुधनी रेल्वे स्थानकाजवळ गाडी आली असता अचानक तेथील रेल्वे रूळ तुटून त्यात मोठी फट पडली. फट पडलेल्या या सदोष रुळावरूनच गाडी पुढे जात असल्याची बाब निदर्शनास आली. तेव्हा तत्काळ लाल सिग्नलने थांबण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे ब्रेक लागून गाडी जागेवरच थांबली. तपासणी केली असता गाडीच्या एस-४ या बोगीखाली रूळ तुटल्याचे व त्यात फट पडल्याचे आढळून आले. ही माहिती गाडीत पसरताच प्रवाशांची झोप उडाली. मात्र प्रसंगावधान राखले जाऊन अनर्थ टळल्याबद्दल प्रवाशांना हायसे वाटले.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन तुटलेले रूळ बदलले. या कामाला सुमारे सव्वा तास वेळ लागला. त्यामुळे हुसेनसागर एक्स्प्रेसला तेवढा वेळ दुधनी येथे थांबावे लागले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.