मी भाजपा सोडते आहे या वावड्या कुठून आल्या? असा प्रश्न भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. मी नाराज नाही असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. इथं सगळे आम्ही एकत्र काम केलेले लोक आहोत. त्यांच्यावर काय नाराज व्हायचं? असाही प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं काहीही म्हटलं नव्हतं. अकारण नसताना या सगळ्या गोष्टी पसरवल्या गेल्या असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

पंकजा मुंडे यांनी मध्यंतरीच्या काळात एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले होते. आता १२ डिसेंबरच्या म्हणजे गुरुवारच्या एक दिवस आधी पंकजा मुंडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मी भाजपा सोडणार या वावड्या कुणी उठवल्या असा प्रश्न त्यांनी विचारला. तसंच जे काही अंदाज लढवण्यात आले ते मीडियाने लढवले. मी त्याकडे शांतपणे पाहात होते असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मी पुन्हा येईनवरही भाष्य

‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यावर बरीच टीका झाली. या घोषणेतून कुठेतरी गर्व डोकावतो अशा स्वरुपाची टीका करण्यात आली. तसंच या घोषणेची खिल्लीही उडवण्यात आली. त्याबाबत विचारण्यात आलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, ” मी पुन्हा येईन ही घोषणा निवडणूक प्रचाराचा एक भाग होती. त्यात गर्व कुठेही डोकावलेला आम्ही तरी पाहिला नाही. आता लोक या कँपेनची खिल्ली उडवली जाते आहे. पराभव झाला की अशा घोषणांची खिल्ली उडतेच ” असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.