राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ हे पक्ष सोडून शिवसेनेत म्हणजेच स्वगृही परतणार अशा चर्चांना गेल्या दोन दिवसांपासून उधाण आलं आहे. मात्र आपण शिवसेनेत जाणार नाही. शिवसेनेत जाणारा छगन भुजबळ कोणीतरी वेगळाच असेल असं म्हणत या सगळ्या चर्चांना भुजबळांनी पूर्णविराम दिला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून छगन भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांवर पडदा टाकत शिवसेनेत जाणार नाही असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

याआधी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले त्यावेळीही छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याहीवेळी प्रसारमाध्यमांसमोर येत छगन भुजबळ यांनी हे वृत्त फेटाळले आहे. अगदी तशाच प्रकारे गेल्या दोन तीन दिवसांपासून होणाऱ्या चर्चेलाही भुजबळ यांनी पूर्णविराम दिला आहे. मी येवल्यात आहे त्यामुळे मुंबईत मी जाण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच आपण शिवसेनेत जाणार नाही शिवसेनेत जाणारा छगन भुजबळ कोणी तरी वेगळा असेल असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिलं आहे.

छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा पंकज भुजबळ हे दोघेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रंगली होती. मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जेव्हा अशी चर्चा रंगली होती तेव्हा मुंबईत शिवसैनिकांनी बॅनर लावून लखोबा लोखंडे आहात तिथेच राहा असे म्हटले होते आणि या सगळ्या चर्चांवर तीव्र नाराजी वर्तवली होती. दरम्यान सगळ्या चर्चा फेटाळून लावत आपण शिवसेनेत जाणार नाही असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.