मी फक्त भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नाही तर सर्वपक्षीय समर्थक आहे. कोणत्याही एका राजकीय पक्षाशी बांधिल नाही, असे स्पष्टीकरण योगगुरू रामदेवबाबांनी दिले.

सोलापुरात चार दिवसांच्या भेटीसाठी आल्यानंतर सायंकाळी रामदेवबाबांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी आपणावर भाजपचे समर्थक म्हणून शिक्कामोर्तब करणे गैर असल्याचे नमूद केले. आपण सर्वपक्षीय आहोत. यापूर्वी काँंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही योगविषयक धडे घेतले होते. सोनिया गांधी यांनी रायबरेलीत किंवा राहुल गांधींनी अमेठीत उद्या योग शिबिरासाठी आपणांस आमंत्रित केले तर आपण तेथे आनंदाने जाऊ, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

योग ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. योगाचा प्रसार जगभरात झाला आहे. योग हा सर्वासाठी व सर्वांच्या कल्याणासाठी आहे. त्यात जाती-धर्माचा अडथळा असू शकत नाही, असेही ते म्हणाले. सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला मोठा वाव असून त्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.