22 July 2019

News Flash

मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा लढणार – अर्जुन खोतकर

जालना लोकसभा मतदारसंघात दानवे यांच्याविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेले अर्जुन खोतकर यांनी आपण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं म्हटलं आहे

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेले दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आपण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अर्जुन खोतकर यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यापुढे दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा पाढा वाचला होता.

अर्जुन खोतकर यांनी सांगितलं आहे की, मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास आपण तयार आहोत. उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल. उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील. पण अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहोचलेला नाही.

रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील संघर्ष पराकोटीला गेल्याने खोतकर यांनी दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले. खोतकर यांचा राग शांत करून त्यांची समजूत काढण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मध्यस्थ म्हणून जालन्यात धाव घेतली होती. देशमुख-दानवे यांनी खोतकरांच्या घरी हजेरी लावल्यानंतरही खोतकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री खोतकर यांना ‘वर्षां’ बंगल्यावर बोलावून घेतले. आता युती झाली आहे. राग सोडा एकत्र काम करू, असे फडणवीस यांनी त्यांना सांगितले. त्यावर आम्हीपण युतीतच होतो ना, मंत्रीही होतो. मग अन्याय का केला. जालन्यात शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास का दिला, असा सवाल खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला. बुधवारी खोतकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दानवे यांनी जालन्यातील शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला, खोटय़ा गुन्ह्य़ांत अडकवले याचा पाढा त्यांनी ठाकरे यांच्यासमोर वाचला. त्यावर फडणवीस आणि दानवे भेटायला येणार आहेत. त्या वेळी यावर निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी खोतकर यांना सांगितले.

First Published on March 14, 2019 10:29 am

Web Title: i am ready to fight lok sabha election says arjun khotkar