“देवेंद्र भुयार यांना मी भाऊ अशी हाक मारतो. ते संघटनेतून आलेले आमदार आहेत. त्यांना मी हक्काने भाऊ म्हणतो. अगदी त्याच हक्काने देवेंद्र फडणवीस यांनाही भाऊ अशी हाक मारु शकतो. त्यांनी भावासारखं फक्त ट्रीट केलं पाहिजे.”  असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. यावर विधानसभेत त्यांनी तुम्हाला भावासारखं ट्रीट केलं नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा रोहित पवार म्हणाले, ” ज्या दिवसापासून विधानसभेत आम्ही त्यांना पाहतो आहोत, त्या दिवसापासून अजूनपर्यंत शांततेत कोणतीही चर्चा विधानसभेत झाली नाही. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहू काय घडतं ” असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन २०२० या एबीपी माझाच्या कार्यक्रमातल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

याच मुलाखतीत त्यांनी सोशल मीडियावरही भाष्य केलं. “सोशल मीडियाला दोन बाजू असतात. एक चांगली बाजू असते आणि दुसरी वाईट बाजू असते. एखादी गोष्ट कमी प्रमाणात केली असेल पण जास्त प्रमाणात दाखवायची असेल तर सोशल मीडियाचा वापर हा केला जातो. काही पोर्टल्सही आहेत जी खोट्या बातम्या, अफवा पसरवण्याचं काम करतात. सगळे पोर्टल्स असं करतात असं नाही मात्र काही पोर्टल्स या गोष्टीही करतात. ही सोशल मीडियाची नकारात्मक बाजू आहे असं मला वाटतं” असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. “सोशल मीडियाला सकारात्मक बाजूही आहे. एखाद्या साध्यातला साधा माणूस जरी चांगलं काम करत असेल तर लोकांपर्यंत ते काम पोहचणं हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं. ही सोशल मीडियाची सकारात्मक बाजू आहे.” असंही रोहित पवार म्हणाले.

निवडणूक काळात सोशल मीडियाचा वापर हा गेल्या पाच वर्षांमध्ये वाढला आहे. आपल्या देशात, राज्यात असे अनेक युवक आहेत जे शिक्षित झाले आहेत. पण त्यांच्या हाताला काम नाही. काम नसल्यामुळे ते सोशल मीडियाचा वापर करतात. युवकांकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने काही वेळा दुर्दैवाने चुकीची बातमीही त्यांच्यापर्यंत पोहचू शकते. ही बाब दुर्दैवी आहे. तसंच बेरोजगारीचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे असंही आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.