अहमदनगरच्या उपमहापौरपदी असताना श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढले होते. यासंदर्भातले एक संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ही बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली आणि शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला. राज्याच्या जनतेने व्यक्त केलेला हा रोष आणि राग एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की श्रीपाद छिंदमला भाजपाने पक्षातून बडतर्फ केले. उपमहापौरपदाचा राजीनामाही त्याने दिला अशा बातम्या आल्या.

मात्र आता याच उपमहापौरपदाचा राजीनामा मी दिलेला नाही, शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर केला आणि बनावट सहीने उपमहापौरपदाचा राजीनामा तयार केला असा आरोप श्रीपाद छिंदमने केला आहे. तसेच याप्रकरणी शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी श्रीपाद छिंदमने केली आहे. भाजपा खासदार दिलीप गांधी यांनीच छिंदमची भाजपातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले होते, त्याचवेळी त्यांनी त्याचा राजीनामा लिहून घेतल्याचेही स्पष्ट केले होते. आता मात्र छिंदमच्या आरोपांबाबत ते काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत असे समजते आहे.

शिवसेनेचे छिंदमला प्रत्युत्तर

श्रीपाद छिंदमने हे आरोप केल्यावर शिवसेनेने यावर प्रत्युत्तर दिले आहे. महापौर सुरेखा कदम यांचे पती आणि अहमदनगरचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी एक पत्रक काढूनच श्रीपाद छिंदमच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. श्रीपाद छिंदमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असे या पत्रात म्हटले आहे. श्रीपाद छिंदमने अहमदनगरच्या उपमहापौरपदी असताना देशाचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरले. हे सगळे प्रकरण समोर आल्यावर छिंदमच्या विरोधात राज्यात संतापाची लाट उसळली. आता बुद्धी भ्रष्ट झालेल्या छिंदमला राजीनामा दिलाच नसल्याचा साक्षात्कार झाला आहे. खासदार दिलीप गांधी यांनी छिंदमचा राजीनामा घेतलाच नाही का? शिवसेनेविरोधात लेटरहेडचा गैरवापर केल्याच्या आरोप करणाऱ्या छिंदमबाबत भाजपा खासदार गप्प का? असेही प्रश्न या पत्रात कदम यांनी विचारले आहेत.

महापौरांची बदनामी करण्यासाठीच छिंदम बिनबुडाचे बेछुट आरोप करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशपब्द बोलणाऱ्या छिंदमचा राजीनामा घेण्याचे नाटक भाजपाने केले का? गांधी आणि छिंदम यांनी संगनमत करून जनतेची दिशाभूल तर केली नाही ना? असेही कदम यांनी आपल्या पत्रात विचारले आहे. एकंदरीतच काय तर शिवसेनेवर आरोप करणाऱ्या श्रीपाद छिंदमला शिवसेनेने खरमरीत उत्तर दिले आहे.