माणूस हा जातीने मोठा होत नाही, नागपुरात जातीचं राजकारण चालत नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपण जात-पात मानत नसल्याचं स्पष्ट केलं. भाजपाच्या अनुसुचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. त्याच कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले आहे. माझ्याकडे कोणीही जातीचं राजकारण करायला आलं तर त्याला मी प्रतिसाद दिला नाही. नागपुरातील अनुसूचित समाज कायमच भाजपासोबत राहिला आहे, कारण नागपुरात जातीचं राजकारण चालतच नाही असंही गडकरींनी म्हटलं आहे.

काँग्रेसने आमच्याबद्दल अपप्रचार केला. भाजपा हा उच्च जातीच्या लोकांचा पक्ष आहे. तिथे स्पृश्य-अस्पृश्यता पाळली जाते असे सांगत भाजपाबद्दल काँग्रेसनं भ्रम पसरवला. मात्र आम्ही सामाजिक समानता मानणारी माणसे आहोत त्याच धोरणावर आम्ही काम करतो असंही गडकरींनी म्हटलं आहे. राजकारणात एक नियम आहे कनव्हिन्स करता आलं नाही तर कनफ्युज करा, काँग्रेसकडून हीच नीती वापरली जाते आहे असाही आरोप नितीन गडकरींनी केला.

याच कार्यक्रमात त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले. देशाच्या सुरक्षेला जो कोणी धक्का लावेल त्याची गय करणार नाही असे गडकरींनी म्हटले आहे.