“आमच्याकडे असलेले पैसेच संपले.. आता मुलाला कसं खाऊ घालायचं?” असा उद्विग्न करणारा सवाल एका आईने विचारला आहे. महाराष्ट्रातले अनेक स्थलांतरीत मजुरांनी आपल्या गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. या काळात सार्वजनिक वाहतूक बंद आहे. त्यामुळे अनेक मजूर आपल्या पर राज्यात असलेल्या गावी पायी जात आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरुन उत्तरप्रदेशातील जौनपूरला पायी चालत जाणाऱ्या मजुरांच्या समुहातील एका आईची व्यथा आता समोर आली आहे.

प्रीती कुमारी असं त्यांचं नाव आहे. त्या म्हणतात “आम्ही जौनपूरला पायी जातो आहोत. माझ्याकडे असलेले पैसे संपले. आता आम्ही आमच्या लहान मुलाला काय खाऊ घालायचं? पायी प्रवासादरम्यान बिस्किटं देऊन त्याची भूक भागवतो आहोत. पण पुढे काय?” या शब्दांमध्ये त्यांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातला लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा हा तिसरा टप्पा आहे. या लॉकडाउनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक फटका बसला तो हातावरच पोट असलेल्या मजुरांना. यापैकी अनेकांची अन्नाची आणि निवाऱ्याची सोय राज्य सरकारांनी केली. मात्र आता अनेकांनी परतीची वाट धरली आहे. या वाटेवर त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे.