शिखर बँक घोटाळा प्रकरणात माझ्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. ” माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मी या निर्णयाचे स्वागत करतो. मी कधीही कोणत्याच बँकेचा संचालक नव्हतो. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती नाही” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ” माझ्या दौऱ्यांना जो काही प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे ही कारवाई होते आहे” असाही आरोप शरद पवार यांनी केला. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शरद पवार हे कोणत्याही बँकेवर आत्तापर्यंत संचालक म्हणून राहिलेले नाही. सहकारातले तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी  अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. दोन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणूक तोंडावर असताना माझ्यासारख्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणं याचा परिणाम कसा होईल हे सांगायची गरज नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या दौऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र शिखर बँक ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीत बरखास्त झाली. असं सगळं असलं तरीही गुन्हा दाखल होण्याचं टायमिंग आहे त्यावरुन विरोधक सरकारवर बरसू लागले आहेत. या सगळ्या प्रकरणात सरकार चार वर्षे शांत बसलं आणि आता ईडीकडून गुन्हा दाखल होतो म्हणजे ही कारवाई हेतूपुरस्सर करण्यात आली आहे असा आरोप आता सरकारवर होऊ लागला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी आपल्यावर असा काही गुन्हा दाखल झाला आहे याची माहिती आपल्याला नाही असे म्हटले आहे. इतकेच नाही तर माझ्या दौऱ्यांना जो काही प्रतिसाद मिळतो आहे त्यातून ही कारवाई होते आहे असाही आरोप त्यांनी केला.