उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाला व त्या पीडितेचा मृत्यू झाल्याने, सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शिवाय, उत्तर प्रदेश सरकारवर देखील टीका केली जात आहे. येथील स्थानिक प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्भूमीवर विरोधकांनी अधिक आक्रमक होत सरकारला धारेवरच धरल्याचे दिसत आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या अगोदरही येथील घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधलेला आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारने काहीच केले नाही तर, माध्यमांना तिथे जाण्यापासून का रोखले जात आहे? असा प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा- पोलीस महासंचालक घेणार हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट; हायकोर्टानं फटकारल्यानंतर धावाधाव

“मला कळत नाही का माध्यमांना अडवण्यात आले आहे. जर सरकारने काहीच चुकीचे केलेले नाही, तर या प्रकरणातील तथ्यं बाहेर काढण्यासाठी माध्यमांना त्या ठिकाणी (हाथरस) जाऊ दिले पाहिजे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “राम मंदिराची पायाभरणी झाली असली तरी उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ नाही तर जंगलराज”

या अगोदर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा देखील संजय राऊत यांनी निषेध केला आहे. ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असल्याचं सांगत त्यांनी माध्यमांशी बोलताना संताप देखील व्यक्त केला होता.