महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजनाला जाणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळायचं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हे राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी काही हरकत नाही असं म्हटलं आहे. राम मंदिर भूमिपूजनासाठी मी जाणार नाही कारण महाराष्ट्रातला करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे  आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. CNN News 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे- शरद पवार

राम मंदिराला माझा मुळीच विरोध नाही. राम मंदिर त्या जागी व्हावं अशी संमती सुप्रीम कोर्टाने दिली आहे. अशावेळी विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर मान्यवर जात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. अयोध्येतल्या जागेवर राम मंदिर उभं राहतंय ही देखील आनंदाची बाब आहे. मात्र मी त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याला जाणार नाही. त्या सोहळ्यापेक्षा मला करोनामुळे महाराष्ट्रात जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते महत्त्वाचे वाटतात. यानंतर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरे जर भूमिपूजन सोहळ्याला गेले तर? त्यावर शरद पवार म्हणाले की उद्धव ठाकरे जर राम मंदिराच्या भूमिपूजनाला गेले तर काहीही हरकत नाही. त्यांनी जरुर जावं, मात्र महाराष्ट्रातला प्रश्न महत्त्वाचा आहे असं त्यांना वाटलं आणि ते गेले नाहीत तरीही आमचं काहीही म्हणणं नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.