राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या ट्विटसमुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी केलेली ट्विटस ही राजकीय हेतूने प्रेरित असतात अशी टीका केली जाते. याच पार्श्वभूमीवर त्या सक्रीय राजकारणात येण्याच्या चर्चाही राजकीय वतुर्ळात रंगल्या. मात्र आपल्याला राजकारणात रस नसल्याचे अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. इतकचं नाही तर सोशल नेटवर्किंगबद्दल भाष्य करताना त्यांनी ‘सोशल मिडियावर तर मला झाशीची राणी असल्यासारखं वाटतं,’ असंही मत व्यक्त केलं आहे.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमृता यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना भावी वाटचालीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. “तुम्ही गायिका आहात, गृहिणी आहात, विरोधी पक्ष नेत्याची पत्नी आहात तसेच एका मोठ्या बँकेत व्हाइस प्रेसिडंट आहात. भविष्यात राजकारणात यायला, निवडणूक लढवायला आणि राज्याच्या पहिला मुख्यमंत्री बनायला तुम्हाला आवडेल का?,” असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी राजकारणात रस नसल्याचे सांगताना सोशल मिडियावर आपल्याला जे वाटते तेच बोलते असं त्यांनी स्पष्ट केलं. “मी खरचं सांगते मला राजकारणात मुळीच रस नाहीय. माझ्या मनात जे येतं ते मी लगेच बोलते. मग काय होतं तुम्ही पाहताच. सोशल मिडियावर तर मला झाशीची राणी असल्यासारखं वाटतं. सगळे लोकं इकडून तिकडून वार करता आणि मी तशीच उभी राहते. मग परत तसचं काहीतरी करते. त्यामुळे मी एक वेगळ्या प्रकारची व्यक्ती आहे असं मला वाटतं,” असं अमृता यांनी सांगितलं. “मला लोकसेवा करायला आवडते. लोकसेवेतून मला आनंद मिळतो,” असंही पुढे बोलताना अमृता यांनी स्पष्ट केलं.