मी फेसबुकवर पोस्ट लिहिली, त्यामागे कोणतीही अस्वस्थता नव्हती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. माझ्या मनात खदखद नव्हती. मात्र १ डिसेंबर ते १२ डिसेंबर ज्या ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाले असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी पॉवरगेम खेळते आहे, मला विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहे अशाही काही चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते अशी घोषणा केली असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

“मी भाजपा सोडणार नाही, पराभव झाल्याने मी खचून गेलेली नाही. कोअर कमिटीमध्ये मी राहणार नाही हा निर्णय मी घेतला. कारण १ डिसेंबर ते १२ डिसेंबर या १२ दिवसांमध्ये ज्या काही चर्चा रंगल्या त्यामुळेच मी हा निर्णय घेतला असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. मी हे पद स्वतःसाठी सोडलं” असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

“एकनाथ खडसे यांचं मंत्रिपद गेलं तेव्हाही मी व्यक्त झाले होते. तसंच एकनाथ खडसे यांना तिकिट मिळालं नाही याचंही मला वाईट वाटलं. पक्षाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे तो निर्णय पक्षाला घ्यावा लागला असेल असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांच्याबाबत जे काही घडलं त्याला मी न्याय की अन्याय या तराजूत तोलणार नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला डावललं जात असेल तर त्या व्यक्तीने किती सहनशक्ती ठेवायची याला मर्यादा असू शकतात” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

“मी अस्वस्थ होते, मात्र आता मला स्वतःला आजमावून पाहायचं आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा शून्यावर यायचं ठरवलं. पंकजा मुंडे यांचं कर्तृत्त्व काय असा प्रश्न विचारला जातो आता हाच प्रश्न मला पुन्हा एकदा स्वतःला विचारायचा आहे त्यामुळेच मी कोअर कमिटीची सदस्य हे जे एकमेव पद होतं त्याचाही राजीनामा दिला” असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.