ईव्हीएमला पर्याय म्हणून मतपत्रिकेचा वापर करण्यासाठी कायदा करण्याची सूचना काँग्रेचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ते विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला केली होती. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. माझा तरी ईव्हीएमवर संपूर्ण विश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “काँग्रेसने ईव्हीएम बद्दल कधी काय सांगितलं? हे मला तुम्ही अगोदर सांगा. काँग्रेसचे नाना पटोले तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष होते, विधनासभा अध्यक्ष हे कोणत्याच पक्षाचे राहत नसतात. आता नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले आहेत. आता जर त्यांनी काही वक्तव्य केलं, तर त्याबद्दल चर्चा होऊ शकते. आमचं असं म्हणणं आहे की, ही ईव्हीएम मशीन जेव्हा होती तेव्हा देखील काँग्रेसचे सरकार राजस्थानमध्ये आलं आहे, पंजाबमध्ये आलं आहे.”

तसेच, “बऱ्याचदा विविध पक्षाचे कार्यकर्ते काय करतात? चांगलं बहुमत मिळालं तर सर्व काही ठीक आहे आणि जर खूप जास्त मतांच्या फरकाने पराभव झाला, डिपॉझिट जप्त झालं तर म्हणातात ईव्हीएम मॅनेज केलं आहे. मात्र असं काही नाही ईव्हीएम ठीक सुरू आहे, पेपरलेस काम होतं. माझा तरी ईव्हीएमवर संपूर्ण विश्वास आहे.” असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.