सातारा जिल्ह्यातच माझ्यासमोर शत्रुंची फौज उभी आहे असे म्हणत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे. सातारा जिल्हा आणि फलटण तालुका या ठिकाणी स्व. चिमणराव कदम, माजी खा. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनीही कधीही खालच्या थराला जाऊन राजकारण केले नाही. राजकारण चांगलं असावं खालच्या थराचं नाही असे मीही मानतो. राजकारणात नावारुपाला येण्यासाठी पंचवीस वर्षे कष्ट घेतले आहेत असेही रामराजेंनी म्हटले आहे. दरम्यान राज्यात नाहीत पण सातारा जिल्ह्यातच माझ्या समोर शत्रुंची मोठी फौज आहे, असा चिमटा रामराजेंनी खासदार उदयनराजे व आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता काढला.

फलटणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना रामराजे म्हणाले, आघाडी झाली तरी आपली दुश्मनी यांच्यासोबत राहणार आहे. तालुक्यात मला प्रबळ विरोधकच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे मला विरोध करण्यासाठी कुणाला घाटावरून आणलं जातंय तर कुणाला साताऱ्यातून आयात करावं लागतंय. आपल्याकडे छोटे मोदी, चोक्सी, माल्ल्या असे अनेकजण तालुक्यात व जिल्ह्यात आहेत. मी कोणाचं नाव घेत नाही. पुण्यात काय केलं ते मला विचारून केलं का ते त्यांच्या मरणाने मरतील, मला काही घेणं देणं नाही. मी मोठा आहे, मी दबाव आणला असे म्हणता मग आमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कोणी केली. त्यांच्या मागे मुख्यमंत्री होते त्यांना फलटणचा विकास करता आला नाही. मी काही निवृत्त होणार नाही. आता लिंबाचा मारा नाही तर शिक्षेचा मारा, माझं नाव निंबाळकर त्यामुळे लिंबाच्या मार्‍याने काही होणार नाही. आमची फौज मोठी आहे.

विकास कामात नगरपालिकेतील विरोधक राजकारण करतात. माझं आणि दिगंबर आगवणे यांचं वाकडं नाही. तुम्हाला अजून पोलीसठाणी तोडायची असतील तर शुभेच्छा. फलटणमधील नागरीकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी आपण ही भूमिगत गटार योजना आणली. भुयारी गटार योजनेच्या प्रयत्नांना मला यश आले आहे. मला इथंच उभा रहायचं आहे. मी राजकारण करण्याअगोदर विकास करतो, मग बोलतो. स्व.मालोजीराजे नाईक निंबाळकर व मी धरणे बांधली. त्यामुळे पाणी आले. त्यासाठी खा. शरद पवार यांनी तत्कालीन मंत्री उमा भारती यांच्याकडून १०० कोटी रुपये मिळवून दिले. खा. शरद पवार, ना. देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी, स्व. विलासराव देशमुख यांनी मला विकासकामांसाठी मोलाची मदत केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. दीपक चव्हाण व जिल्हापरिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.