मी शिवसेना सोडेन असं मला कधीच वाटलं नव्हतं असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. लोकसत्तातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा‘ या वेबसंवादात नारायण राणे सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

“शिवसेनेतले अनेक लोक माझ्या बाजूने होते. ठराविक दोघे-तिघेच असे होते ज्यांनी माझ्याविषयी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मत कलुषित केलं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचे कान भरु लागले. माझ्याबद्दल मन दुषित करण्याचं काम झालं. बाळासाहेबांकडून याबाबत विचारणाही होत नव्हती. त्यानंतर मी बाळासाहेबांना सहा पानी पत्र लिहिलं होतं. मी त्यावेळी दहा ते बारा दिवस अमेरिकेला गेलो होतो. त्यानंतर परत आलो. त्यावेळी १२ दिवसांमध्ये काय काय कट-कारस्थानं झाली ते समजलं. माझ्या पत्रकार मित्रांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मी बाळासाहेब ठाकरेंना भेटलो. त्यांना भेटून आश्वासन दिलं की मी राजकारण सोडतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. राजकारणात जाणार नाही असंही सांगितलं होतं. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी काही लोकांना बोलावलं आमचं बोलणं झालं. सगळं काही स्पष्ट झालं. मात्र काही दिवसांनी पुन्हा कारस्थानं होऊ लागली. त्यामुळे मी राजीनामा देण्याचं नक्की केलं.”

“त्यानंतर एक दिवस मी पनवेलला होतो. मी पनवेललाच राजीनामा तयार केला आणि मातोश्रीवर पाठवला. मी मुंबईला येईपर्यंत राजीनामा मंजूर झाला होता. अशा रितीने मी बाहेर पडलो. कोणतीही तक्रार माझ्या विरोधात नसताना मला बाहेर पडावं लागलं. मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहे. माझ्या यशाचं सगळं श्रेय हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं आहे. मी त्याचं एक टक्काही श्रेय घेणार नाही. जे काही शिवसेनेसाठी केलं ते मी कर्तव्य म्हणूनच केलं. ठाकरे या आडनावावर माझी सगळी श्रद्धा आहे. त्यामुळे ठाकरे आडनावाचे आत्ता जे कुणीही आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात छोटासाही आकस नाही, मी आकस ठेवत नाही. राजकीय टीका केली तर मात्र मी उत्तर देईन” असंही नारायण राणे म्हणाले.

“शिवसेनेच्या जन्मापासून मी शिवसेनेसोबत होतो. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हे नावाने ज्या शिवसैनिकांना ओळखत त्यापैकी मी एक होतो. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट चेअरमन या वेगवेगळ्या पदांवर उत्कर्ष होत गेल्याने मी बाळासाहेबांच्या जवळ गेलो. त्यावेळी मला अनेक कामं मला सांगत. निवडणुका आल्या की गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी पाठवलं तरीही मी गेलो. साहेबांचा माझ्यावर विश्वास बसला. त्यांचं प्रेम मला मिळालं. मी बाळासाहेब ठाकरेंसाठी वेडा होतो” असंही राणे यांनी स्पष्ट केलं.