संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून रविवारी संतप्त आंदोलकांनी धुळयातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नंदुरबारच्या भाजपा खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला केला. या सर्व प्रकाराबद्दल बोलताना हिना गावित म्हणाल्या कि, मी गाडीमध्ये बसलेली असताना हा हल्ला झाला. आमचे काही कार्यकर्ते तिथे होते. त्यांनी मला खेचून गाडी बाहेर काढले. मी बाहेर आल्यानंतरही काही जण माझ्या मागे आले व त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला माझा मृत्यू समोर दिसत होता. आंदोलने अनेक प्रकारची होतात पण महिला लोकप्रतिनिधीवर असा हल्ला होणे निंदनीय आहे. हा मॉब लिंचिंग सारखा प्रकार होता असा आरोप हिना गावित यांनी केला आहे.

धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी धुळे, नंदुरबार येथील डीपीडीसीची बैठक होती. या बैठकीसाठी खासदार हीना गावित, आमदार कृणाल पाटील, जयकुमार रावल, सुभाष भामरे, अनिल गोटे आदी उपस्थित होते. बैठक सुरू होण्याआधीपासूनच मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. बैठक झाल्यानंतर सर्वप्रथम बाहेर आलेल्या खासदार गावित यांना आंदोलकांनी रोखले. त्यांनी आरक्षणाबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र गावित यांनी त्यास नकार दिल्याने आंदोलकांनी गावित यांची गाडी फोडली. बाहेरील परिस्थिती चिघळल्याने बैठकीसाठी आलेले आमदार दालनात अडकले होते.

आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची पुढची दिशा काय असावी हे निश्चित करण्यासाठी आज मराठा आरक्षण परिषदेने पुण्यात महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी मराठा समाजातील मान्यवर समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक तसेच खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थित आहेत. आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र अचानक गावित यांची गाडी फोडल्याने या विषयाला हिंसक वळण लागले आहे. राज्यात भाजपाच्या नेत्यांच्या घरांसमोर जाऊन आंदोलन केले जात आहे.