औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज (बुधवारी) मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक दिली आहे.  दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आंदोलकांनी शांततामय मार्गाने आंदोलन करावं. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी घटनेमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आवश्यकता आहे, हा विषय एनडीए सरकारसमोर मांडू अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.

दरम्यान, मराठा समाजास आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत सरकारने जाहीर केलेली ७२ हजार जागांवरील नोकरभरती स्थगित करावी या व अन्य मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. सोमवारी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले आहे. मंगळवारी दादरच्या शिवाजी मंदिर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत बुधवारच्या मुंबई बंदचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारच्या बंदमधून काही जिल्हे वगळण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यंत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंददरम्यान निघणाऱ्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार आणि हिंसा होणार नाही अशी माहिती समन्वय समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली. मराठा समाजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा बैठकीत ठराव करण्यात आला.