विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्मावर बोट ठेवायचं असेल तर मी त्यांना नालायक म्हणायचो असं वक्तव्य माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसंच आगामी निवडणुकीसाठी युती झाली नाही तरीही भाजपाच्या दीडशे जागा जिंकेल असाही विश्वास असाही आत्मविश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. भुसावळ येथे लोणारी मंगल कार्यालयात आज बुथप्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत एकनाथ खडसे बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

मी अनेक वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्मावर बोट ठेवायचं असेल तर मी काही विषय मांडायचो, मी थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत असे. विलासराव मुख्यमंत्री होते, त्यांच्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. पण मी बोलत असताना अशोक चव्हाण उभे राहिले की त्यावेळी कागद घ्यायचो आणि विचारायचो याचं काय झालं? नालायक, अक्कल नाही का? असं बोललो की मुख्यमंत्रीही दचकून जात असत. एवढा तापट माणूस काय विचारतो आहे त्यांची हिंमतही होत नव्हती मला जाब विचारण्याची की मी नालायक शब्द का वापरतोय. मला नालायक शब्द मागे घेण्याची विनंती केली जायची. मग मी तो मागे घ्यायचो पण सुरुवात आक्रमकच करायचो. एवढंच नाही तर शब्द मागे घेतानाही तुम्हाला नालायक नको म्हणू तर काय म्हणू हे तुम्हीच सांगा असंही विचारायचो.

आपल्या भाषणात त्यांनी ही आठवण तर सांगितलीच शिवाय लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपाचाच विजय होईल असेही स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय होणं ही काळ्या दगडावरची रेष आहे असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. भाजपाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, आगामी निवडणुकीत विजय भाजपाचाच आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भाषणानंतर खडसेंनी कार्यकर्त्यांना जे विचारायचे आहे ते विचारा मात्र नाथाभाऊ मंत्री का झाले नाही? हे विचारू नका असं त्यांनी म्हटताच एकच हशा पिकला.