मी आता काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. या पक्षाला उज्ज्वल भवितव्य असल्याने मी जनमताच्या जोरावर खासदार होणारच असा विश्वास पक्षाचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी येथे पक्षाच्या बैठकीत व्यक्त केला.
वाकचौरे म्हणाले, मी खोटे बोलत नाही. मला सत्तेचीही लालसा नाही. भविष्यकाळ डोळय़ांसमोर ठेवून मी काँग्रेसमध्ये सामील झालो. साईबाबांच्या आशीर्वादामुळेच आपण मतदारसंघात कामांचा डोंगर उभा करू शकलो. मात्र निळवंडे धरणाचे कालवे, उजनी धरणाचे काम शिल्लक आहे. भविष्यात ही कामे मार्गी लावायची आहेत. शिर्डीसाठी ३०० कोटी रुपयांच्या पाणीयोजना लवकरच मंजूर होतील. त्यातच कोपरगावच्या स्वतंत्र योजनेचा समावेश आहे. मतदारसंघाचा कृती आराखडा तयार करून तो केंद्र सरकारला पाठवला असून तो अमलात आणणे हेच आपले प्राधान्यक्रमाचे काम आहे असे वाकचौरे यांनी सांगितले.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे म्हणाले, वाकचौरे यांचे केंद्रात घनिष्ठ संबंध असल्याने ते मतदारसंघात मोठा निधी आणू शकतात. त्यासाठीच त्यांना येत्या निवडणुकीत मोठय़ा मतांनी निवडून द्यावे लागले. स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते अशोक रोहमारे यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले, गेल्या दोन वेळेस दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही शिवसेनेचे अशोक काळे यांना मदत केली. मात्र ते खंगर विटेसारखे निघाले. त्यामुळे तालुक्याचा विकास पूर्णपणे खुंटला आहे असे सांगून शिवसेनेचे लोकसभा उमेदवार बबन घोलप यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. परक्या जिल्हय़ातील हे पार्सल तिकडेच पाठवून द्या असे आवाहन त्यांनी केले.
काका कोयटे, अशोक खांबेकर, राजेश परजणे, बाळासाहेब दीक्षित, राजेंद्र जाधव आदींची या वेळी भाषणे झाली. खासदार वाकचौरे पक्ष कार्यालयात येणार म्हणून शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात फलकबाजी व काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी शहर उपप्रमुख भरत मोरे, महेमूद सय्यद, कैलास जाधव, रमेश गवळी, कलविंदर गडियाल यांच्यासह १० ते १५  शिवसैनिकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. पोलीस उपअधीक्षकांनी आम्हाला अपशब्द वापरले असा आरोप कैलास जाधव यांनी करून त्याचा पोलीस ठाण्यातच निषेध केला. पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी मात्र त्याचा इन्कार केला.