पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वकांशी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या मुंबई- सूरत बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. या प्रकल्पासंदर्भात एकतर्फी भूमिका घेण्यात आली असेल तर ती योग्य नसून हा बुलेट ट्रेन प्रकल्पाचा करार अयोग्य वाटल्यास तो महाविकास आघाडी सरकारकडून रद्द करण्यात येईल असं उद्धव यांनी स्पष्ट केलं आहे.  शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली. याच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनसंदर्भात पहिल्यांदाच इतक्या थेटपणे आपली मते मांडल्याचे पहायला मिळालं. या प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्यांच्या पाठिशी शिवसेना उभी आहे असंही उद्धव यांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा >> “आम्हाला मुंबई – नागपूर अशी बुलेट ट्रेन द्या, त्यामुळे…”; मोदी सरकारकडे उद्धव ठाकरेंची मागणी

राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असताना कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेन या दोन प्रकल्पांसंदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले. “बुलेट ट्रेनची गरज नाही असं आपणही म्हणाला होता, शरद पवारही म्हणाले होते. बुलेट ट्रेनमध्ये आपल्या राज्याला फायदा नसून आपल्या राज्याने यामध्ये गुंतवणूक करणं बरोबर नाही, असं मत मांडण्यात आलं होतं. तरीही ६० टक्के जमीन संपादन आतापर्यंत झालं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य काय?,” असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

शिवसेना पक्ष म्हणून त्यांना पाठिंबा देणार

बुलेट ट्रेनसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. तसेच मुंबई- सूरत बुलेट ट्रेन प्रकल्प हा राज्यासाठी फारसा उपयोगाचा नसल्याचे मतही उद्धव यांनी मांडले.  “तिचा (मुंबई – सूरत बुलेट ट्रेनचा) सध्या काही उपयोग नाहीय. या प्रकल्पाची सध्या काही आवश्यकता नाहीय. पण भूसंपादन करते वेळी जिथे विरोध झाला आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांच्यामागे शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून जे काही करायचं आहे तो निर्णय आपण घेऊच पण ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्यांच्यामागे शिवसेना आहे. आता ज्यांनी स्वत:हून जमीन दिली असेल तो कारभार झाला असेल. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांचा मुद्दा महत्वाचा आहे. जसा नाणारचा विषय आहे. नाणार सुद्धा सरकारने करार केला होता. पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाणार प्रकल्पाप्रमाणे आम्ही मुंबई – सूरत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्यांसोबतही असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “तेव्हा मोदींनी सांगितलं होतं की, अशी योजना जाहीर करु नका ज्यामुळे…”; उद्धव ठाकरेंचा खुलासा

सरकार म्हणून भूमिका काय? 

बुलेट ट्रेनसंदर्भात सरकार म्हणून भूमिका घेताना सर्व सहकारी पक्षांना विचारात घेण्याची गरज असल्याचे उद्धव यांनी म्हटलं आहे. “आता सरकार म्हणून सर्वांना मान्य असेल तर करु करार. करोनामुळे बुलेट ट्रेनचा विषयच बॅकसीटला गेला आहे. त्यावर कोणी काही विचारलं ही नाही आणि चर्चा ही झाली नाही. आता सरकार म्हणून विचार करताना, माझी स्वत:ची भूमिका जनतेसोबत जाण्याची असेल. मात्र सरकार म्हणून विचार करु तेव्हा यात राज्याचे हीत आहे की नाही याचा विचार करताना सर्वांना एकत्र बोलवून हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“…तर मी प्रकल्प रद्द करेन”

“विरोधी पक्षात असताना सरकारने २५०-३०० कोटी का द्यावे असा प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता,” अशी आठवण राऊत यांनी करुन दिली. “तो माझा मुद्दा आजही कायम आहे. मात्र सरकार म्हणून विचार करताना या का ची सोडवणूक करणं गरजेचं आहे. या का ला काही कारणं आहेत का? यामधून खरोखर फायदा आहे का. दाखवा आम्हाला फायदा. काय होणार आहे फायदा?, किती मुंबई आणि सूरतमधून ये जा होणार आहे?, किती आर्थिक घडामोड होणार आहे? हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या, जर पटलं तर जनतेसमोर ठेवले. जर नसली तर कदाचित मी असं म्हणेन की एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेल तर आता योग्य नाहीय. आता मला तो (हा करार) अयोग्य वाटला तर तो मी रद्द करेन,” असं उद्धव यांनी स्पष्टपणे सांगितलं.

नक्की वाचा >> “आज गुंतवणूक नाकारुन उद्या चिनी राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात गळे घालून मिरवणार असाल तर…”

कोस्टल रोड होणारच

याच मुलाखतीमध्ये राऊत यांनी कोस्टल रोड प्रकल्पासंदर्भात प्रश्न विचारला असता त्याचे काम सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. “तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री नव्हता तेव्हा काही प्रकल्पांच्या बाबतीत तुम्ही लक्ष घातलं होतं. विशेष: मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्प. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहिली तर कोस्टल रोड होणार आहे की नाही?,” असा थेट राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. “कोस्टल रोडचं काम चालू आहे की. कोस्टल रोडचं काम कुठेही थांबलेलं नाही. कोस्टल रोडचं काम जोरात सुरु असून त्यासाठी आपण पैशांचे नियोजन करुन ठेवलेलं आहे,” असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.