माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती. आदरांजली वाहिल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांना हात जोडत बोलण टाळलं. मात्र, परत जात असताना फडणवीसांना बघून शिवसैनिकांनी मी पुन्हा येईन… अशी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रासह सर्वच मान्यवरांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विविध पक्षातील नेत्यांसह राज्यभरातून लोक आलेले आहेत. दरम्यान, दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले. त्यांच्यासोबत विनोद तावडे आणि पंकजा मुंडे हेही उपस्थित होते. शिवतीर्थावर पुष्प अर्पण करून फडणवीस यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ आल्यानंतर त्यांनी हात जोडले. फडणवीस निघून गेल्यानंतर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. “बाळासाहेब भाजपा-शिवसेना युतीचं प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इथे आलो होतो. सर्व कार्यकर्त्यांसमवेत स्मरण केलं. बाळासाहेबांची कमी जाणवतेय. त्यांच्या विचारांची उणीव भासतेय. आमचे राजकारणापलीकडं बाळासाहेबांशी वैयक्तिक जिव्हाळ्याचं संबंध होते,” असं सांगत पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांनी राजकीय भाष्य टाकळं. तर देवेंद्र फडणवीस परत जात असताना शिवतीर्थावर जमलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… अशा घोषणा देत शिवसैनिकांनी भाजपाविरूद्धचा रोष व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे यांना राजकीय नेत्यांनी आदरांजली वाहिली. काँग्रेसचे नेते भाई जगताप, राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विविध पक्षाचे नेत्यांनी अभिवादन केलं. त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह शिवतीर्थावर आले होते. यावेळी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.