कोल्हापूर : यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे राजकीय वर्तुळाला धक्का दिला.

कोल्हापूर पोलीस दलातर्फे दिला जाणाऱ्या गणराया अ‍ॅवॉर्डचे वितरण तसेच जिल्ह्यतील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य व शासकीय विभागाचे अधिकारी यांची संयुक्त समन्वय बैठक आज महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत   केशवराव भोसले नाटय़गृह येथे आयोजित केली होती.

या कार्यक्रमात स्पिकरची भिंत लावण्याच्या मुद्दय़ावरून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत मतभेद निर्माण झाल्याने अचानक कलाटणी देत मंत्री पाटील यांनी धक्का देणारे विधान केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार क्षीरसागर यांच्या विरोधातील काही नावे पुढे येत असून, त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही नाव असताना पाटील यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळाला चक्रावणारी ठरली.

गणेशोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यमध्ये कोणत्याही स्पिकरची भिंत लावली जाऊ  नये यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. पालकमंत्री पाटील यांनीही अशीच भूमिका सातत्याने घेतली आहे.

मात्र आज या कार्यक्रमावेळी ध्वनियंत्रणेच्या मुद्दय़ावरून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी गणेश मंडळाच्या अपेक्षांना साद घालणारी भूमिका मांडली. ते म्हणाले, न्यायालयाच्या अधीन राहून  स्पिकरची  भिंत लावण्यास परवानगी दिली जावी. गणेश मंडळाचे कार्यकर्ते आवाज मर्यादेचे पालन करतील. आमदार  क्षीरसागर यांनी स्पिकरची भिंत लावण्याचे एका अर्थाने समर्थन केल्याने मंत्री पाटील यांनी वेगळाच पवित्रा घेतला.

आमदार  क्षीरसागर यांनी खुशाल निवडणूक लढवावी, असे नमूद करून महसूलमंत्री पाटील यांनी यापुढे लोकसभा, विधानसभा, पदवीधर मतदारसंघ अशी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे घोषित केले.  गणेशोत्सव काळात स्पिकरची भिंत लावली जाऊ  नये, अशी भूमिका घेण्यामागे माझा कसलाही राजकीय हेतू नाही. अशा बाबतीत पैशाचा अपव्यय करण्यापेक्षा गणेश मंडळांनी भागातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करावी, असा सल्ला त्यांनी दिला.