राजकारण म्हटलं की महत्त्वकांक्षा आलीच. मग ती तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असो वा राज्याच्या. अशीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं,” असं म्हणत कारणांवरही भाष्य केलं. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात चर्चा रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता? त्यावर बोलताना पाटील म्हणाले,”आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल. एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,” असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलची मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.

आणखी वाचा- मेट्रोच्या प्रश्नावर अतिशय अक्षम्य दुर्लक्ष, नवीन कमिटीचा निव्वळ फार्स – फडणवीस

जयंत पाटील यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. आमदारांची संख्या सर्वाधिक असलेल्या शिवसेनेकडं मुख्यमंत्रीपद असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्री आलेलं आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार असं सत्तावाटपावेळी ठरलेलं असल्यानं राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्री पद येण्याची शक्यता कमीच आहे.