भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान सुखरुप परत आले याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनापासून आनंद आहे. पाकिस्तानाच्या ताब्यात असताना ते ज्या धैर्याने आणि शूरपणे परिस्थितीला सामोरे गेले त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान अटारी-वाघा सीमेवरुन रात्री ९.२० च्या सुमारास भारतात दाखल झाले. पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफमध्ये कागदपत्राच्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर अभिनंदन यांनी भारतीय सीमेत प्रवेश केला. दोन दिवस ते पाकिस्तानाच्या ताब्यात होते.

अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समजल्यापासून सर्व देशवासियांच्या जीवाला घोर लागला होता. शुक्रवारीही भारताकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने अनेकांची धाकधुक वाढली होती. अखेर रात्री नऊच्या सुमारास तो ऐतिहासिक क्षण आला व अभिनंदन यांनी भारतात प्रवेश केला. सर्व देशवासियांसाठी तो क्षण खूप भावूक होता.