चिन्मय पाटणकर chinmay.reporter@gmail.com

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिग आर्ट्स अँड  रीसर्च (आयपार) या संस्थेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सवाचे उद्घाटन इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष महंमद सैफ अल अफखाम यांच्या हस्ते नुकतेच झाले. महोत्सवात भारतीय नाटकांसह परदेशातील नाटकंही सादर होत आहेत. हा महोत्सव रविवापर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवासाठी अफखाम पुण्यात आले होते. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद..

* जागतिक दृष्टिकोनातून तुम्ही भारतीय रंगभूमीकडे कसं पाहता?

– भारतीय रंगभूमी अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. कारण, भारत हा विविधतेनं संपन्न असा देश आहे. भारताला हजारो वर्षांचा वारसा आहे. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भारतीय रंगभूमी वेगळी ठरते. त्या शिवाय बॉलिवूडचंही जगाला वेगळं आकर्षण आहे. भारतातील संपन्न परंपरा, लोकसंस्कृतीचा वापर अधिकाअधिक रंगभूमीसाठी करून घेतला पाहिजे. भारतात अनेक गुणवान कलाकार आहेत. त्यांना नाटकाकडे वळवले पाहिजे. त्या दृष्टीने पुण्यात होणारा आयपार महोत्सव महत्त्वाचा आहे. असेच काही चांगले महोत्सव भारतातील विविध शहरांमध्ये होतात. त्यामुळे भारतातील नाटय़क्षेत्रात चांगली कामगिरी होत आहे, असं मला वाटतं.

* सध्याच्या काळात बहुतांश देशात विविध पद्धतीनं कट्टरतेचा प्रभाव वाढत असल्याचं दिसून येतं. त्याचा नाटकावर काय परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं?

– सत्तेत असलेल्या सरकारचा नाटकावर काहीही परिणाम होतो असं वाटत नाही. नाटकाचा आवाज आजही बुलंद आहे. आजही नाटक हे बदलाचं कारण ठरत आहे. नाटक हे समाजासाठीचं खूप महत्त्वाचं माध्यम आहे. नाटकानं नेहमीच समाजाचा आरसा म्हणून काम केलं पाहिजे. नागरिकांशी संवाद साधला पाहिजे, त्यांना दिशा दिली पाहिजे. नाटक हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही. त्यातून नव्या विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी. नाटकातून समाजातील परिस्थिती मांडतानाच प्रेक्षकांना सकारात्मक विचारही दिला पाहिजे. सर्वात पहिल्यांदा आपण नाटकातून आपल्या समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत. कारण जागतिक प्रश्नांइतकेच आपले स्थानिक प्रश्न मांडलं जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपले प्रश्न नाटकातून मांडू, तेव्हाच प्रेक्षक नाटकाकडे वळतील.

* नाटक हे नेहमीच क्रांतीचं माध्यम होतं. त्या दृष्टीनं सध्या रंगभूमीवर काय चालू आहे असं तुम्हाला वाटतं?

– नाटक म्हणजे प्रत्येकाचा आवाज होत आहे. वेगवेगळ्या संस्कृती, धर्मातील लोकांना जोडण्याचं काम करत आहे. कारण नाटक हे प्रभावी कला, माध्यम आहे असं मला वाटतं. नाटकातून काम करताना आपण कोणाच्याही विरोधात, कोणत्याही सरकार विरोधात काम करणं अपेक्षित नाही. तर नाटकातून कधीही शांतीचाच संदेश दिला पाहिजे. लोकांना एकत्रितपणे, शांततेनं जगावं हा विचार नाटकानं मांडला पाहिजे. नाटक हे सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं ठरू शकतं. नाटक हे नेहमीच सर्वसामान्यांचं माध्यम होतं.

* सेन्सॉरशिप हा नाटकापुढील प्रश्न आहे. त्या विषयी काय सांगाल?

– आपले प्रश्न मांडण्यासाठी नाटकाप्रमाणेच इतरही मार्ग आहेत, माध्यमं आहेत. त्यामुळे केवळ विषय मांडण्यापासून रोखलं जातं म्हणून सरकारशी भांडण्यात अर्थ नाही. मात्र, आपले विषय नाटकातून मांडण्यासाठी हुशारीनं काम केलं पाहिजे. कलात्मक पद्धतीनं विषयाचं सादरीकरण केलं पाहिजे. म्हणजे सेन्सॉरशिपचा प्रश्नच येत नाही.

*  इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटच्या (आयटीआय) आगामी काळातील काय योजना आहेत?

– जगभरात आम्ही नाटकाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत आहोत. नाटक हे महत्त्वाचं माध्यम असल्याचं भान देण्याचा, त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी जगातील अधिकाधिक देशांमध्ये आयटीआयच्या शाखा सुरू करण्याचा मनोदय आहे. धर्माच्या, संस्कृतीच्या, वर्णाच्या पलीकडे जाऊन ही पृथ्वी प्रत्येकासाठी हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी  विविध देशांना जोडण्यासाठी नाटक हे सेतू व्हावं, वेगवेगळे धर्म, संस्कृती यांना जोडण्यासाठी नाटक हे माध्यम ठरावं, जगात शांतता नांदावी यासाठी नाटकाचा प्रसार होणं महत्त्वाचं आहे.