आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धापरीक्षांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करून ‘आयएएस’ दर्जाचे अधिकारी तयार व्हावेत, यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली. कळवण तालुक्यातील नांदुरी येथे आयोजित २२ व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाचा समारोप सावरा यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खा. हरिश्चंद्र चव्हाण तसेच विविध राज्यांतून आलेले आदिवासी समाजातील प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी सावरा यांनी आदिवासी मुला-मुलींमध्ये उत्कृष्ट क्रीडा गुण असून ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये देशाचे नाव ते मोठे करू शकतात, असे नमूद केले. आदिवासींमधील क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी इगतपुरी आणि नंदुरबार येथे स्वतंत्र क्रीडा अकादमी उभारण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आदिवासी समाज देशातील मूळ निवासी आहे. आदिवासी बांधवांमध्ये नैसर्गिक क्षमता भरपूर असून त्याला योग्य संधीची गरज आहे. त्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च करत आहे. याची फलश्रुती प्रत्यक्षात यावी यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासोबत त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी शाळा, वसतिगृहात चांगल्या सुविधा द्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धापरीक्षांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आदिवासींमध्ये अनेक जमाती आहेत. त्यांच्यासाठी योजना राबवताना त्यांच्या विकासाचा निधी इतर क्षेत्रांकडे अथवा विभागाकडे जाणार नाही याकडे लक्ष दिले जाईल, असेही ते म्हणाले.
९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच १४ व १५ ऑगस्ट हे दिवस आदिवासी सांस्कृतिक दिवस म्हणून साजरे केले जातात. हे दिवस अधिक चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत यासाठी शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी विकासाच्या विविध योजनांबाबत मतप्रदर्शन केले. संमेलनात राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, लडाख आदी भागांतील आदिवासी कलाकार, कारागीर सहभागी झाले. त्यांच्या विविध कलाकृती आणि कलागुणांचे प्रदर्शन भरविण्यात आले.