समृद्धी महामार्गातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये क्लिन चिट मिळाल्यानंतर आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार मंगळवारी सेवेत रुजू झाले. त्यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

राधेश्याम मोपलवार यांच्या काही वादग्रस्त ध्वनिफिती आणि सीडी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात जाहीर केल्या होत्या. यावरुन समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोपलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारकडे अहवाल सादर केला. या अहवालात ऑडिओ टेप्समध्ये छेडछाड झाल्याचा उल्लेख होता.

दुसरीकडे ही ध्वनिफीत तयार करणाऱ्याला मोपलवार यांच्याकडून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. त्यामुळे मोपलवार यांना क्लिन चिट मिळणार हे स्पष्ट होते. क्लिन चिट मिळताच मोपलवार मंगळवारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. मोपलवार यांच्याकडे पुन्हा एमएसआरडीसीची धुरा सोपवल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय होते अहवालात?
ऑडिओ टेप्समध्ये ज्या जमिनीबाबत चर्चा सुरु होती ती जमीन बोरीवलीत होती. समृद्धी महामार्ग भिवंडी ते नागपूरपर्यंत जाणार आहे. त्यामुळे बोरीवलीच्या जमिनीचा संबंधच येत नाही. ही ध्वनिफित अशा पद्धतीने ‘एडिट’ करण्यात आली की ते संभाषण समृद्धी महामार्गाबाबत सुरु आहे, असा समज होईल, असे अहवालात म्हटल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या ऑडिओ टेप्सची समितीने चौकशी केली.