नागपूरचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी फेसबुक पोस्टद्वारे नागरिकांना खास आवाहन केलं आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणालेत की, कोणतीही लक्षणे नसताना माझा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सरकारच्या सर्व नियम आणि अटींचं पालन करत होम क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करत आहे. तुम्हीही गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचं पालन करावं, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. मुंढे यांनी आपल्या फेसबुक पोस्टची सुरुवात आणि शेवट ऑल इज वेल असं लिहून केली. यातून त्यांनी सर्व काही ठिक आहे, असाच संदेश दिला आहे.

गेल्या आठवड्यात तुकाराम मुंढे यांनी करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती. कोणतीही लक्षणे नाहीत मात्र नियमांप्रमाणे गृह विलगीकरणात राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांनी फेसबुकपोस्टद्वारे जनतेला आवाहन केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटीव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो,” असंही तुकाराम मुंढे यांनी नमूद केलं.

तुकाराम मुंढे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेय की,

“All is Well…!

मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना २४ ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे. ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी.  ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो.

All is Well…!”

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची नुकतीच पुन्हा एकदा बदली झाली. नागपूर आयुक्तपदावरुन बदली करुन त्यांना मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नियुक्ती देण्यात आली आहे.