भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांच्या घरगुती गणेश विसर्जनावेळी इचलकरंजीतील शहापूर खणीत तराफा उलटल्याची घटना घडली. या घटनेत आमदार हाळवणकर, त्यांच्या मुलांसह वरिष्ठ अधिकारी या अपघातामध्ये नदीत पडले. मात्र, या सर्वांना वाचवण्यात यश आले आहे. गणेशमुर्ती विसर्जनावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधील शहापूर खणीतील बँरेलचा तराफा उलटल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. तराफा अचानक उलटल्याने तराफ्यामध्ये असणारे आमदार सुरेश हाळवणकर , त्यांची दोन मुले , अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, उपअधिक्षक विनायक नरळे, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.प्रकाश रसाळ हे पाण्यात पडले होते.  मात्र,  आमदार हाळवणकरांसह पाण्यात पडलेल्या अकरा जणांना काठावरील व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक, पोलिस, आणि नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले. बुडालेल्यांपैकी डॉ. रसाळ यांच्या पोटात पाणी गेल्याने उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.