News Flash

आयडीबीआय बँक व्यवस्थापकांची आत्महत्या

वडसा तालुक्यातील सावंगी येथील आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक निर्मलेश गणपतराव बोंदरे (३५) यांनी वडसा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आली.

| March 5, 2015 06:41 am

वडसा तालुक्यातील सावंगी येथील आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक निर्मलेश गणपतराव बोंदरे (३५) यांनी वडसा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आली.
मूळचे नागपूर जिल्ह्य़ातील काटोल येथील रहिवासी असलेले निर्मलेश बोंदरे हे सावंगी येथील आयडीबीआय बॅंकेत व्यवस्थापक होते. वडसा येथे मा.गांधी वार्डात पवार यांच्या घरी ते भाडय़ाने राहात होते. आज सकाळी राहत्या खोलीत त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, आजच बॅंकेचा वर्धापन दिवस होता. आजच निर्मलेशने आत्महत्या केली.
डोकेदुखीच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली असल्याचे सांगण्यात येत आहे. या आत्महत्येची पोलिसांनी नोंद घेतली आहे.

धनादेश अनादरप्रकरणी कंत्राटदाराला ३ महिने शिक्षा, दंड
प्रतिनिधी, वर्धा
येथील बडे कंत्राटदार विजयकुमार राजू उर्फ विजूअण्णा यांना धनादेश अनादर प्रकरणी न्यायालयाने तीन महिने साध्या कारावासाची सजा व तीन लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. येथील सातवे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी मंदार पांडे यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला.
आर्या कंस्ट्रक्शनचे विजयकुमार यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वर्धा व देवळी तालुक्यातील प्रत्येकी आठ रस्त्यांच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले होते. हे कंत्राट मिळाल्यानंतर राजू यांनी फिर्यादी शशांक निकम यांच्या सी-झोन कन्सल्टंसी या कंपनीस १५ लाख रुपयात रस्ते बांधकामापूर्वीचे साहित्य परिमाण, क्रॉस सेफ रीन व अन्य कामाचे कंत्राट दिले.
फिर्यादी निकम यांनी दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण केले. यानंतर विजयकुमारने त्यांना कामाचे काही पैसे दिले व उर्वरित रकमेपोटी २ लाख रुपयांचा धनादेश दिला. तो बँकेत पुरेशा रकमेअभावी वटला नाही. त्यावर फिर्यादी निकमने कायदेशीर नोटीस बजावून पोलिसातही तक्रार केली.
न्यायाधीशांनी या प्रकरणी प्राप्त पुरावे व झालेल्या युक्तिवादाआधारे विजयकुमार राजू यांना दोषी ठरविले. या प्रकरणात फिर्यादी निकम यांची बाजू अ‍ॅड. अमोल कोटंबकार यांनी मांडली.

‘सावकारी कायदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा’
प्रतिनिधी, बुलढाणा
महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चा कायदा विदर्भासह राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखवण्यासाठी राज्य सरकारने केला, परंतु सध्या सावकारी कायद्यातील असंख्य त्रुटींमुळे हा कायदा प्रभावी अंमलबजावणीअभावी रखडल्याचा आरोप सावकारग्रस्त शेतकरी समितीने केला आहे.
हा कायदा १९४६ निरस्त झाल्याने प्रलंबित असलेल्या राज्यातील हजारो सावकारी प्रकरणाची न्यायालयीन व्याप्ती बघता त्या गुन्ह्य़ांमध्ये २०१४ च्या कायद्यानुसार फेर गुन्हे दाखल करावे व कर्जदार शेतकरी तक्रारीची कालमर्यादा १५ वर्षांवरून ३० वष्रे वाढवावी, यासह इतर महत्वाच्या मागण्यांकरिता हिवाळी अधिवेशनात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात सहकार आयुक्तांच्या कार्यालयात एक बठक आयोजित करण्याचे ठरले होते. परंतु त्यानंतर कोणतीही बैठक शासनाद्वारे आयोजित केली नाही, असा आरोप समितीने केला आहे. या सर्व मागण्यांसाठी समितीने पदाधिकारी राज्यपालांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे समितीचे संस्थापक अध्यक्ष अरुण जाधव तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकाश पिंपरकर यांना राष्ट्रीय कलिंगा पुरस्कार
प्रतिनिधी, बुलढाणा
राजस्थानमधील उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या १४ व्या अधिवेशनात येथील ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीत अग्रगण्य असलेले प्रकाश पिंपरकर यांना राष्ट्रीय कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अधिवेशनाला मंत्री किरण माहेश्वरी व डी.एन.चापके यांची उपस्थिती होती.
भारतातून तीन हजार ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले असून यापैकी १२०० महाराष्ट्रातील होते. यात भारतातून नऊ ज्येष्ठ नागरिकांना मंत्री किरण माहेश्वरी यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात येथील पिंपरकर यांच्या रूपाने हा बहुमान बुलढाणा जिल्ह्यास प्रथमच मिळाला. रविवारी मुख्य सचिव प्रभाकर नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक व पोलीस पाटील जाळय़ात
गडचिरोली – गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ट्रॅक्टर मालकाकडून साडेसात हजाराची लाच घेताना चामोर्शीचे पोलीस उपनिरीक्षक नेपालचंद्र मुजूमदार व वालसरा येथील पोलीस पाटील भगीरथ भांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 6:41 am

Web Title: idbi bank manager commits suicide
टॅग : Maharashtra
Next Stories
1 म्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन योजना दोन दिवसांत सुरू
2 सांगली बाजारातील हळदीचा व्यापार सुरू
3 श्रीरामपूर बाजार समितीवर प्रशासक
Just Now!
X