वर्धा, चंद्रपूरमध्ये आदर्श कृषी प्रकल्प राबवणार

शेतीतील रासायनिक खतांचा वारंवार वापर सोडून शाश्वत शेतीकडे जाण्याची गरज आहे. त्यासाठी वर्धा चंद्रपूर हे जिल्हे कृषीक्षेत्रासाठी ‘आदर्श’ करण्याचा संकल्प आहे. या दोन जिल्हय़ात शाश्वत शेतीचे पथदर्शी प्रकल्प राबवले जातील, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जिल्हा कृषी प्रदर्शन व वऱ्हाडी खाद्य महोत्सवाचे उद्घाटन आज मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून ‘अन्य सुरक्षा सैन्य’ ही संकल्पना मांडली. जे विकू शकतो, ते पिकवलं तर भारताचा शेतकरी जग जिंकू शकेल. त्यासाठी सेंद्रिय व शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज आहे. २०१४च्या अर्थसंकल्पात हा विचार मांडला होता. त्याला धरून राज्यशासनाने जलयुक्त शिवार, शेततळे, विहिरी यासाठी भरघोस निधी दिला. राज्यातील शेती पावसावर अवलंबून असल्याचे लक्षात घेऊन शासनाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली. रासायनिक खतांमुळे शेतीची उत्पादकता कमी झाली. मित्र कीड नष्ट झाली. शेतीचा खर्च प्रचंड वाढला. आपला शेतमाल विषयुक्त झाला. जगाच्या बाजारपेठेत त्याला किंमत मिळेनाशी झाली. मातीवरचा हा अत्याचार वाचवण्यासाठी विषमुक्त शेती हाच पर्याय आहे. म्हणून चंद्रपूर व वर्धा जिल्हय़ात विषमुक्त शेतीचा पथदर्शी प्रकल्प राबवणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. कृषीक्षेत्रातील नवे बदल माहीत होण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात कृषीमहोत्सव घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अर्थसंकल्पात कृषीक्षेत्राशी निगडित १५ हजार ९०९कोटी रुपयाच्या कामाची तरतूद केली आहे. वध्रेत कृषीकार्यालय बांधण्यासाठी दोन कोटी रुपये देत असल्याची घोषण करताना पालकमंत्र्यांनी या कार्यालयाची रचना शेतकऱ्यांना दिलासा देणारी राहील, असा विश्वास व्यक्त केला.

शेती व संलग्नित विभागाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण असलेल्या पुस्तिकेचे याप्रसंगी प्रकाशन करण्यात आले. डॉ. भोयर यांनी मदनी येथे जलयुक्त शिवार योजनेने साधलेल्या परिणामांचे छायाचित्र पालकमंत्र्यांना भेट दिले. तसेच जिल्हा कृषीकार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीची मागणी आपल्या भाषणातून केली. यावेळी खा. तडस यांचेही भाषण झाले. जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांनी प्रास्ताविकातून कृषी प्रदर्शनाची माहिती दिली. जिल्हाधिकारी शैलेश नवल, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. मुख्याधिकारी अजय गुल्हाने यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.