जि. प.अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर व राज्यमंत्री सुरेश धस या दोन्ही मंत्र्यांनी दांडी मारली. परिणामी शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकणारे शिक्षक पुरस्कार यंदा वेळेत जाहीर झाले. मात्र, मंत्र्यांच्या दांडीमुळे पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा हिरमोड झाला.
जि. प.अंतर्गत दरवर्षी शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण केले जाते. पुरस्कारार्थी शिक्षकांची निवड करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रस्तावांची छाननी करून यादी जाहीर केली. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहता दरवर्षी हे पुरस्कार कोणत्या ना कोणत्या वादात सापडतात. दोन वर्षांपूर्वी परवानगीअभावी ऐन वेळी पुरस्कार वितरण रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. यंदा पुरस्कारांची घोषणा ऐनवेळी, गुरुवारी करण्यात आली. विविध विभागांतून २० शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली. शुक्रवारी दुपारी १ वाजता पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर व महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण आयोजित केले होते. त्यामुळे शिक्षक व त्यांचे स्नेही जिल्हाभरातून यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात जमा झाले. मात्र, दोन्ही मंत्री ऐनवेळी गरहजर राहिले. दुपारी दोन वाजता शिक्षण सभापती क्षीरसागर व अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. मंत्र्यांच्या दांडीने मोठय़ा अपेक्षेने आलेल्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा हिरमोड झाला.