जळगाव पालिकेतील एका प्रकरणाच्या अनुषंगाने खडसे यांचा इशारा

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात होताच भाजपमध्ये स्वबळ दाखवावे की शिवसेनेशी युती करावी, या मुद्यावरून दोन गट पडले आहेत. युतीसाठी आग्रही असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना महापालिकेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, महापालिकेतील एका प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यास १०० पेक्षा अधिक आजी-माजी नगरसेवक तुरूंगात जातील, असा इशारा देत खडसेंनीही पालिकेच्या मैदानात उडी घेतली आहे

भाजप आमदार सुरेश भोळे आणि समर्थकांचा एक गट स्वबळासाठी आग्रही आहे. खडसेंच्या नेतृत्वाखाली भाजपने २५ वर्षे पालिका निवडणुकीत सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीशी लढत दिली आहे. या निवडणुकांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही बाजूने एकमेकांविरूध्द गुन्हेही दाखल झाले आहेत. यामुळे शहरात हे दोन्ही गट एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी जैन यांच्याबरोबर युतीचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या वादापासून आतापर्यंत दूर राहिलेल्या खडसे यांनी प्रथमच आपले मत मांडले.

शहरातील मुक्ताई निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील २५ वर्षांपासून महापालिकेची जबाबदारी आपण स्वीकारत होतो. कधी कोणाशी युती करण्याची गरज भासली नाही. एकटय़ाच्या जोरावर आपण लढलो. लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचा झाला. एकदा ३४ नगरसेवक निवडून आले. आपणास पक्ष महत्वाचा आहे. यंदा महापालिका निवडणुकीत युतीबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींकडे कोणतीही चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या पुढय़ात जळगाव महापालिकेचे एक प्रकरण पडून आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर कारवाईचा निर्णय घेतल्यास २४ तासांच्या आत महापालिकेचे शंभरपेक्षा अधिक आजी-माजी नगरसेवक आणि अधिकारी तुरूंगात जातील. तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. त्या कागदपत्रांची प्रत आपल्याकडेही आहे, असे खडसे यांनी सांगितले. हे प्रकरण कोणते आहे, हे मात्र त्यांनी उघड केले नाही. जळगाव महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत भांडलो. तेथील प्रवृत्तीविरुद्ध लढलो आणि संघर्ष कायम ठेवला. अनेकांशी वाईटपणा घेतला. आता संघर्ष करण्याची आपली मानसिकता राहिलेली नाही. चाळीस वर्षांची आपली तपश्चर्या बिनबुडाचे आरोप करुन घालवली. विरोधात असताना संघर्ष केला, परंतु सत्तेत आल्यावर दोन वर्ष मंत्रिपदापासून दूर  जावे लागले, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.