23 July 2019

News Flash

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आत्महत्या करेन, धर्मा पाटील यांच्या मुलाचा इशारा

धर्मा पाटील यांच्या मुलाने म्हणजेच नरेंद्र पाटीलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इ-मेल केला आहे

मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलानेही आता आत्महत्येचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासह तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर आत्महत्या करू असा इशारा धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. या संदर्भात धर्मा पाटील यांच्या मुलाने म्हणजेच नरेंद्र पाटीलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इ-मेल केला आहे.

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येला वर्ष होते आहे. याप्रकरणी अजूनही दोषींवर कारवाई झालेली नाही. दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अपयशी ठरले आहेत. या सगळ्यांनी या प्रकरणाचा जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे पद सोडावे असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

मागणीकडे त्वरित लक्ष देऊन कारवाई न झाल्यास माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मी आत्महत्या केली तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल असेही नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. धुळे जिल्ह्यातील विखरण या गावात राहणाऱ्या धर्मा पाटील यांनी वीज प्रकल्पासाठी गेलेल्या शेत जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्याने मंत्रालयात २२ जानेवारी २०१८ ला विष प्यायले होते. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान २८ जानेवारी २०१८ ला निधन झाले. आता त्यांच्या मुलानेही आत्महत्येचा इशारा दिला आहे.

First Published on December 7, 2018 1:46 pm

Web Title: if chief minister not giving resignation i will commit suicide says dharma patil son narendra patil