काँग्रेसकडून आघाडीचा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव अद्यापर्यंत आलेला नाही. आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत जागांसंदर्भातली चर्चा होणार नाही. काँग्रेस आम्हाला १२ जागा देणार नसेल तर आम्ही स्वबळावर लढू असे भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीची राज्यातील ४८ जागांवर लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाऊ असा इशाराच प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

शिर्डी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची रोखठोक भूमिका जाहीर केली. चार किंवा सहा जागा अशी आमची मागणी फक्त प्रसारमाध्यमांमध्ये सुरु आहे. जागांविषयी अद्याप कोणतीही चर्चाच झालेली नाही असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. काँग्रेसने तीनवेळा ज्या जागा लोकसभा निवडणुकांमध्ये हरल्या त्या जागांची मागणी आम्ही केली आहे. कोणत्या १२ जागा आम्हाला द्यायच्या हे काँग्रेसने ठरवायचे आहे, असे म्हणत आंबेडकर यांनी आता जागावाटपाचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात सरकवला आहे.

एवढंच नाही तर यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही टीका केली. हा पक्ष संभाजी भिडे चालवतात या मतावर मी अजूनही ठाम आहे. आमची आघाडी काँग्रेससोबत असून काँग्रेसने कोणासोबत जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. शरद पवार हे पुरोगामी आहेत मात्र त्यांचा पक्ष प्रतिगामी आहे या राष्ट्रवादीला लोक धडा शिकवतील असाही टोला आंबेडकर यांनी लगावला.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांचं नाव न घेता त्यांनाही टोला लगावला. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांसाठी काम केलं आहे. मात्र काही जणांनी बाबासाहेबांच्या या विचारालाच हरताळ फासला आहे. वंचित बहुजन आघाडीत जातीय नेत्यांना कोणतीही जागा नाही असं त्यांनी म्हटलं आहे.