पराभव साजरा करण्याचं नशीब कुणाचं असतं? पराभव साजरा केला तर त्यात गैर काय?  धनंजय मुंडे यांनी माझ्यावर काय टीका मला कल्पना नाही पण पराभव साजरा करण्याची करण्याची खिलाडू वृत्ती माझ्यात आहे. इतके दिवस सगळे म्हणत होते ताई घराच्या बाहेर पडत नाहीत. आता बाहेर पडले तर म्हणत आहेत की पराभव साजरा केला. पराभव साजरा करण्याचं नशीब कुणाचं असतं? एखादी पराभूत व्यक्ती जर नांदेडपासून आठ जिल्ह्यांमधलं स्वागत स्वीकारत येत असेल आणि त्याचा एवढा मोठा मेळावा होत असेल तर ही पुण्याईच म्हणेन मी असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

पंकजा मुंडे यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान गडावर मेळावा घेतला. या मेळाव्याला फक्त ५० लोकांच्या उपस्थितीची संमती देण्यात आली होती. मात्र या मेळाव्याला बरीच गर्दी झाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी काही लोक पराभव साजरा करतात असं म्हणत पंकजा मुंडे यांचंं नाव न घेता टीका केली होती. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आज उसतोड कामगारांविषयीच्या बैठकीसाठी पुण्यात एकत्र आले होते. या दोघांमध्ये चांगला संवादही दिसून आला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता त्यांनी पराभव साजरा करण्यात गैर काय असं म्हटलं आहे.

उसतोड कामगारांचे नेतृत्व हा माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही तर त्यांचं पालकत्व माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तर पंकजा मुंडे यांच्यासोबत तुमचा चांगला संवाद दिसून आला असाच पुढे बघायला मिळेल का? असा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारला असता जनतेच्या प्रश्नावर एकत्र असण्यात वावगं काय? याचा अर्थ सगळं मागचं सगळं मिटलं असाही नाही असं उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.