कोणताही माणूस आयुष्यात ‘परफेक्ट’ नसतो, त्यामुळे माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील तर त्या पोटात घालून मला चुका सुधारण्याची संधी द्या, असे भावनिक आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी वाईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले.
वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे यांच्या प्रचारासाठी आयोजित केला होता. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर , आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, सुनील काटकर, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, पंचायत समिती सभापती मनिषा शिंदे, नगराध्यक्षा निलीमा खरात आदी यावेळी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले,की आमदार मकरंद पाटील आणि मी राजकारणाआधीचे मित्र असून आमचे मत्रीचे नाते अतूट आहे. आघाडी सरकारने या पाच वर्षांत खूपच चांगले काम केले असून त्याच आधारावर मीही माझ्या मतदार संघात अनेक कामे केली आहेत. मला ज्येष्ठांचे आशीर्वाद, माताभगिनींची साथ व तरुण मित्रांच्या सहकार्याची गरज आहे. माझ्याकडे कोणतेही पद नसतानाही माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाचे मी माझ्यापरीने काम केले आहे. यापुढेही मी आणि आ. मकरंद पाटील २४ तास ३६५ दिवस तुमच्या सेवेत राहणार आहोत.आपण सर्वानी गावोगावी जाऊन मतदान कसे वाढेल याकडे लक्ष दय़ावे, असे आवाहन केले.
आमदार मकरंद पाटील म्हणाले की, उदयनराजे भोसले आणि मी पहिल्यापासून चांगले मित्र आहोत. त्यांच्या उमेदवारीला काही तात्त्विक कारणाने विरोध केला होता. तेव्हाही मी उदयनराजे सोबत होतो आणि आजही मी त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनापासून पक्षाचे काम करायचे आहे.  कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवायचा नाही. लोक आपल्यात भांडणे कशी लागतील ते पहात आहेत. त्यामुळे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी झाले गेले विसरुन उदयनराजेंना मोठया मताधिक्याने विजयी करायचे आहे. या वेळी दिलीप येळगावकर, शशिकांत पिसाळ  यांची भाषणे झाली.