भाजपाचे दिवंगत नेते यांच्या नाडीवर हात ठेवून आपण त्यांना वाचवलं असतं असा अजब दावा शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी हा अजब दावा चक्क औरंगाबाद येथे सुरु असलेल्या सरकारच्या आरोग्य शिबिरात केला आहे. प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्या भावाने गोळीबार केला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रमोद महाजन अत्यवस्थ होते तेव्हा मला त्यांच्यापर्यंत पोहचू दिलं नाही. पोहचू दिलं असतं तर नाडीवर हात ठेवून जप करून त्यांना वाचवलं असतं असा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे ते बऱ्याचदा चर्चेत असतात आता त्यांनी पुन्हा एकदा असंच अजब वक्तव्य केलं आहे. राज्य सरकारच्या आरोग्य शिबीरात अनेक तज्ज्ञ डॉक्टर समोर बसलेले असताना त्यांनी हा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रमोदजी जेव्हा रूग्णालयात होते तेव्हा मला गोपीनाथ मुंडे म्हटले होते तू काहीतरी कर. सिद्धिविनायक मंदिरात जा काहीतरी फूल वगैरे घेऊन ये. माझ्याकडे एक पुडी होती. तो अंबाबाईचा अंगारा होता, तो मी राहुलकडे दिला. राहुलला सांगितलं प्रमोदजींच्या उशीखाली ही पुडी ठेव. प्रमोद महाजन यांच्या उशीखाली ती पुडी ठेवल्यावर मी तिथे गेलो होतो मी जप केला. पण मला त्यावेळी प्रमोद महाजनांना हात लावता आला नाही. तिथे जाण्याची कुणाला संमतीच नव्हती. ती मिळाली असती तर मी महाजनांना वाचवू शकलो असतो असा दावा खैरे यांनी केला आहे. प्रमोदजी बारा दिवस जगले, त्यानंतर शांत झाले. त्याच एका कामात मला अपयश आलं नाहीतर मला आत्तापर्यंत अशा प्रयोगांमध्ये एकदाही अपयश आलेलं नाही. जशी डॉक्टरांची शक्ती असते तशी आमची सदिच्छा असते. मी अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत नाही खरोखरच सांगतो आहे असंही खैरे यांनी सांगतिलं.

अनेकदा मी रूग्णालयांमध्ये जात असतो, कोणाला काही मदत हवी असेल तर मी माझ्या परिने करतो. एका बाईला चालता येत नव्हतं तेव्हा आपण तिला कसं बरं केलं याचाही अनुभव त्यांनी सांगितला. सरकारच्या आरोग्य शिबीरात चंद्रकांत खैरे हे एखाद्या भोंदूबाबा प्रमाणे दावा करत होते आणि उपस्थित त्यांना ऐकत होते. नाडीवर हात ठेवू दिला असता तर मी प्रमोद महाजन यांना वाचवू शकलो असतो असा दावा आता त्यांनी औरंगाबादमध्ये केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If i was allowed to hold pramod mahajans pulse i could have saved him claims shiv sena mp chandrakant khaire
First published on: 23-02-2019 at 18:10 IST