शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ही चांगली बाब आहे. मात्र याबाबतची अंमलबजावणी जुलै महिन्यापर्यंत झाली नाही तर शिवसेना सरकारला मोठा धक्का देईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. जुलै महिना संपेस्तोवर राज्यातल्या अल्पभूधारक शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशी शिवसेनेची आग्रही भूमिका आहे.

राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली हा शेतकरी आंदोलनाचा सगळ्यात मोठा विजय आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली कशी होईल याकडे शिवसेनेचे लक्ष आहे,असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या कर्जमाफीला माफी न म्हणता कर्जमुक्ती म्हणा, शेतकऱ्यांना माफी द्यायला त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणतांब्याच्या शेतकऱ्यांमुळे राज्यात शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटली. त्यामुळे पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी आपली रोखठोक भूमिका मांडली. याआधी जुलै महिन्यात भूकंप घडवून आणू, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. तसेच आपल्या या इशाऱ्याला घाबरून भाजपने कर्जमाफी दिली अशी गर्जनाही केली होती. आता आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी जुलै महिना संपेस्तोवर कर्जमाफी करण्याचा इशारा दिला आहे. तसे न झाल्यास सरकारला जाब विचारण्यासोबतच मोठा धक्का देण्याचीही तयारी शिवसेनेने केली आहे.

कर्जमाफी झाल्यानंतर शिवसेनेमुळेच कर्जमाफी मिळाली या आशयाचे बॅनरही मुंबईत झळकले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मन आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिवसेना वारंवार प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे. कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी आणि इतर मागण्यांसाठी राज्यातले शेतकरी १ जूनपासून संपावर गेले होते. त्यानंतर ८ जूनला शेतकरी प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. अल्प भू धारक शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ केले. तर इतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी २५ जुलैपर्यंतचा अवधी घेतला आहे. अशात आता शिवसेनेने कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी पाठपुरावा करण्यास सुरूवात केली आहे.