लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त्यांबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपतींना परत करणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे. राळेगणसिद्धी येथे अण्णा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काही वेळापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांनी उपोषण स्थगित करावे यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांना यश आले नाही.

महाजनांसोबत झालेल्या बैठकीनंतर अण्णा हजारे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले, समाजाची सेवा करण्यासाठी तुम्ही मला हा पुरस्कार दिला. मात्र, समाजाची जर दुरावस्था झाली असेल आणि सरकार त्याकडे कानाडोळा करीत असेल तर मला हा पुरस्कार नको. त्यामुळे ८ आणि ९ तारखेला सरकराचा निषेध करण्यासाठी पद्मभूषणही मी राष्ट्रपतींना परत करणार आहे.