महाबीजचे बियाणे सदोष असेल, तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करा, मात्र त्यासोबतच चांगल्या बियाण्यांचे पुन्हा वाटप करून शेतकऱ्यांची भरपाई करावी, असे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज वर्धा येथे दिले.  कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कृषीमंत्री विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी विविध गावात शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

सदोष बियाण्यांच्या विक्रीबाबत बोलतांना कृषीमंत्री भुसे म्हणाले की,  इतर कंपन्यांसोबतच जर सदोष बियाणे असेल तर महाबीजवर पण कारवाई करावी. शेतकऱ्यांचे नुकसान टळावे म्हणून पुन्हा चांगल्या बियाणांचे वाटप करावे. सोयाबीनचे बियाणे उपलब्ध न झाल्यास, तुरीचे बियाणे कृषी केंद्रात उपलब्ध करून द्यावेत. तसेच, शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये म्हणून तालूका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्रांना वारंवार भेटी देत दुकानातील साठा व विक्री यांची शहानिशा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कृषी कर्जासंदर्भात बोलतांना कृषीमंत्र्यांनी टाळेबंदीपूर्वीच बँकांना कर्जमाफीचा पैसा देण्यात आला होता. शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची पत निर्माण व्हावी आणि त्यांना पुन्हा कर्ज मिळावे, यासाठी बँकांना पैसे देण्यात आले आहे. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची प्रकरणे मार्गी लागणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. बँका प्रतिसाद देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी दर दिवसांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा घ्यावा. कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून शेतकऱ्यांना घरी बसून अर्ज करता येईल, असे अ‍ॅप तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

आमदार रणजीत कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जि.प. मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.