महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. “लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात निघून गेले आहेत. हे परप्रांतीय मजूर पुन्हा जर महाराष्ट्रात येणार असतील तर ‘आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये’ नोंदणी व वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात यावा” अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यपालांकडे केली आहे.

लॉकडाउनच्या काळात या मजुरांची आपआपल्या राज्यात परतण्यासाठी धडपड सुरु होती. पण सरकारकडे त्यांची कोणतीही नोंदणी नसल्याने त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागला. राज्य सरकारकडे या मजुरांची नोंदणी असती तर सर्वांना त्यांच्या राज्यात नियोजन करुन सोडणे सोयीस्कर ठरले असते.

आणखी वाचा- अमित ठाकरेंचे अजित पवार यांना पत्र ; केली ‘ही’ मागणी

‘राज्यात या आधी झालेल्या चूका सुधारण्याची हीच वेळ आहे’ असे मनसेने म्हटले आहे. “राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे या शहरांमध्ये करोनाला आळा घालण्याच्या उपायोजना कमी पडत आहेत. ही शहरे अधिक लोकसंख्येचा भार सहन करु शकणार नाहीत. राज्यातील कंपन्या, व्यवसाय बंद होत असल्याने स्थानिकांना रोजगाराची जास्त आवश्यकत आहे. त्यामुळे ८० टक्के स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी” सुद्धा मनसेने केली आहे. त्याशिवाय परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय बांधवांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हटले आहे.