केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली  उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील. अशा शब्दांमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांच्यावर टीका केली आहे.

”रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले..” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर केलेली आहे. तसेच, “मोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे व वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही, रेमडीसीवीर वेळेत पुरवठा होत नाही, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. जाणूनबुजून केंद्रसरकार अन्याय करतेय की, केंद्रसरकारला काम करता येत नाही.” असं देखील मलिक यांनी या अगोदर म्हटलेलं आहे.

Coronavirus Crisis : केंद्रसरकार जाणूनबुजून अन्याय करतेय की, काम करता येत नाही – नवाब मलिक

नवाब मलिकांच्या या विधानांना प्रत्युतर देताना दरेकर म्हणाले आहेत की,  “मला वाटतं नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील. त्याच्या वक्तव्यांमधून राज्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात उपाययोजना सुचवण्याचं कधी ऐकीवात नाही. असलेल्या व्यवस्था बळकट करण्यासाठी, गतीमान करण्यासाठी काय करतो आहोत, हे कधी त्यांच्या पत्रकारपरिषदेतून ऐकल्याचं मला आठवत नाही. केवळ केंद्र सरकारला लक्ष करत, दुसऱ्या राज्याची उदाहरणं देत, जी आपल्या सोयीची आहेत. या संकट काळातही आपलं केवळ राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्नच नवाब मलिक यांच्या दररोजच्या पत्रकारपरिषदेतून दिसतो आहे.”

तसेच, “इतर राज्यांचं सांगत असताना इतर राज्यांनी करोनाच्या या संकटात ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांचा आपल्याकडे अंमल करण्यासाठी काय केलं? याचं उत्तर ते देऊ शकणार नाहीत. त्यामुळे मला वाटतं की केंद्र व राज्य अशाप्रकारचं चित्र तयार करून हा वाद बंद करण्याची आवश्यकता आहे. परदेशातून मदत मिळाल्यावर पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर टीका केली जाते.  परंतु आज फ्रान्सच्या माध्यमातून कतारमधून आपल्याला नौकेतून वैद्यकीय यंत्रसामुग्री ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स येत आहेत. आज अनेक देश आपल्याला मदतीचा हात पुढे करत आहेत. जर परराष्ट्रांना आपण मदत केली नसती.” असंही दरेकर यांनी सांगितलं आहे.

रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले – नवाब मलिक

याशिवाय “संकट काळात तरी अशाप्रकारचा संकुचीत विचार करणं योग्य आहे, असं मला वाटत नाही. थाडो व्यापकदृष्टीने विचार केला जावा. सुसंवादातून चांगल्या समन्वयातून सगळेजण मिळून हे सकंट दूर करूयात, अशाप्रकारची त्यांच्याकडून मी नम्र अपेक्षा व्यक्त करतो.” असंही दरेकरांनी शेवटी बोलून दाखवलं आहे.