करोनाची लक्षणं दिसली नाहीत तर कुणाचीही चाचणी करण्याची गरज नाही असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. येणाऱ्या काळात आपल्याला करोनासोबतच जगायचं आहे. त्यामुळे आपली काळजी आपण घेऊनच आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लक्षणं दिसली तर टेस्ट जरुर करुन घ्या मात्र लक्षणं नसतील तर टेस्ट करण्याची गरज नाही असं ते म्हणाले.  मंत्रिमंडळ बैठक, वर्धापन दिन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक प्रकारच्या तक्रारीकडे सरकारचं बारकाईनं लक्ष आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

धनंजय मुंडेंवर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. १० दिवसांमध्ये ते पुन्हा सक्रिय होतील असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांना मृतदेहांची हेळसांड होत असल्याबाबतचा प्रश्नही विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले असं फक्त एका मृतदेहाच्या बाबतीत घडलं होतं. मात्र आरोग्य सेवेच्या बाबतीत कोणतीही हयगय केली जाणार नाही. आम्ही प्रत्येक तक्रारीकडे बारीक लक्ष ठेवून आहोत असंही त्यांनी सांगितलं.

मुंडे यांच्याबाबत काय म्हणाले राजेश टोपे?

“धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. पण अजित पवारांच्या शिस्तीप्रमाणे आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळतो. मंत्रिमंडळाची लोक सुरक्षेच्या अंतरावर होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रमही पाच मिनिटांचा होता. कोणतंही भाषण देण्यात आलं नाही. ध्वजारोहण करतानाही फक्त पाच लोक उपस्थित होते. कोणालाही करोनाची लक्षणं जाणवलेली नाहीत. आयसीएमआरच्या गाइडलाइनप्रमाणे लक्षणं नसतील तर चाचणी करण्याचा विषय येऊ शकत नाही,” असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.