सध्या राजकीय वर्तुळक्षेत्रात राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. अद्याप दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने दुजोरा दिला नसला तरी यावर नेते भाष्य करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे आघाडीत आले तर फायदाच होईल असं मत व्यक्त केलं आहे. छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना आघाडीत घेण्याला समर्थनच दिलं आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत जागावाटपाची चर्चा सुरु आहे का विचारलं असता छगन भुजबळ यांनी आपल्याला यासंबंधी कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. मात्र राज ठाकरे सोबत आले तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नक्कीच फायदा होईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, आगामी निवडणूक आघाडीसाठी महत्त्वाची असून प्रत्येक मताची गरज आहे. राज ठाकरे मोदी सरकारच्या विरोधात असून त्यांच्यामागे हजारो मतं आहेत. यामुळे आघाडीला त्याचा नक्की फायदा होईल.

आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारणात कोणताही दरवाजा बंद नसतो. मात्र, सध्या राष्ट्रवादी आणि मनसेत ‘आघाडी’संदर्भात कोणतीही चर्चा सुरु नाही”, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तर मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी देखील पक्षाकडून यासंदर्भात कोणतेही आदेश आलेले नाही, असे म्हटले आहे.