महाराष्ट्रात सत्ता बदल होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केले तर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उच्चपदावर राहिलेल्या नोकरशहांना फटका बसू शकतो. त्यांच्याकडे कमी महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ती प्रक्रिया सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात प्रधानसचिव राहिलेल्या भूषण गगराणी यांच्याकडे उद्योग सचिव पद देण्यात आले आहे. मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीतील झाडे कापण्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एमएमआरसीच्या प्रमुख अश्विनी भिडे यांच्यावर नाराज आहे. आरे कॉलनीतील झाडे कापू नये ही जनभावना असताना झाडे तोडण्यात आली. त्यामुळे उद्या आम्ही सरकार स्थापन केले तर या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी लागेल असे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही सत्तेवर आलो तर मेट्रो ३ ची कारशेड आरे बाहेर नेऊ असे आदित्य ठाकरे यांनी अनेकवेळा सांगितले आहे.

चार वर्ष मुख्यमंत्री कार्यालयात राहिलेल्या प्रविण परदेशी यांच्यावरही कुऱ्हाड कोसळू शकते. सध्या ते मुंबई महापालिकेचे आयुक्त आहे. सीएमओमध्ये आधी प्रधान सचिव नंतर अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. महत्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी करण्याआधी फडणवीस परदेशींचा सल्ला घ्यायचे असेही म्हटले होते. अश्विनी भिडे आणि प्रविण परदेशी हे फडणवीस यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील अधिकारी म्हणून ओळखले जातात.

अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्याबरोबरही शिवसेनेचे फारसे सख्य नाही. अश्विनी जोशी यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे आम्ही जवळपास निश्चित केले होते. पण निवडणुकीमुळे आम्ही थांबलो. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही लगेच हा प्रस्ताव मांडू असे एका नगरसेवकाने सांगितले. ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्याबरोबरही शिवसेनेचे फारसे जमत नाही. आणखी हायप्रोफाईल आयएएस दांम्पत्य मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांची सुद्धा बदली केली जाऊ शकते.